औरंगाबाद – औरंगाबाद ते पैठण एनएच क्रमांक 752-ईचे रुंदीकरण बारा वर्षांपासून रखडले होते. त्याला आता मुहूर्त लागणार आहे. येत्या 24 एप्रिलला केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते रुंदीकरण कामाचे भूमिपूजन होणार आहे.
950 कोटी रुपयांतून भूसंपादनास चौपदरी डांबरी रस्ता करण्यात येणार आहे. पैठण रस्त्याच्या भूमिपूजनासह एनएच 211 अंतर्गत झाल्टा ते करोडी ते तेलवाडी या महामार्ग टप्प्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. औरंगाबाद ते पैठण महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना जाहीर झाली आहे. काही ग्रीनफिल्ड तर काही प्रमाणात ब्राऊन फिल्ड मध्ये हा महामार्ग तयार करण्यात येणार आहे. भारतमाला प्रकल्पाचा भाग असलेल्या या महामार्गासाठी अंदाजित 950 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
या महामार्गामुळे औरंगाबाद पैठण रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत मिळेल. या महामार्गावर दोन उड्डाणपूल, बिडकीन येथे इंटरचेंज आणि पंधरा लहान अंडरपास, महामार्गालगतच्या गावांसाठी सर्विस रस्ता तयार करण्यात येणार आहे. यासाठी 100 हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे.