हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतेच तौक्ते चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात मोठे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रासह, केरळ, तामिळनाडू, गोवा आणि गुजरात या राज्यांनाही चांगलाच तडाखा बसला आहे. दरम्यान संपूर्ण वाहतुक व्यवस्था, वीजपुरवठा, अनेक लोकांची घरे, मोठमोठ्या बागायती यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर या चक्रीवादळात बॉलिवूडचा सिंघम अर्थात अजय देवगण याच्या आगामी चित्रपटाच्या सेटलाही मोठा तडाखा बसला आहे. ई-टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या चक्रीवादळाने अजय देवगणच्या ‘मैदान’ या चित्रपटाच्या सेटचे मोठे नुकसान केले आहे. या सेटवर चित्रपटातील मुख्य आणि महत्वाच्या भागांचे शूटिंग केले जाणार होते. मात्र वादळामुळे या सेटची अवस्था न पाहण्याजोगी झाली आहे.
https://www.instagram.com/p/CCNSgBlpqsg/?utm_source=ig_web_copy_link
मिळालेल्या रिपोर्टनुसार, तौक्ते चक्रीवादळ आले तेव्हा सेटवर सुमारे ४० लोक उपस्थित होते. सेट वाचवण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. परंतु, भयावह वादळासमोर त्यांचा टिकाव लागला नाही. या चित्रपटाच्या सेटचे नुकसान होण्याची ही आतापर्यंतची दुसरी वेळ आहे. यापूर्वी १६ एकर मध्ये बांधलेल्या या हायकॉस्ट मेंटेनन्स असणाऱ्या सेटला मे २०२० साली कोविड-१९ च्या पहिल्या लाटेतील लॉकडाऊन आणि पाऊस यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा चक्रीवादळाचा फटका बसल्याने त्यांना पुन्हा आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.
https://www.instagram.com/p/CIsFUOtJO8W/?utm_source=ig_web_copy_link
आगामी चित्रपट ‘मैदान’चे आऊटडोअर चित्रकरण कोलकाता आणि लखनऊ येथे करण्यात येत आहे. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर करत आहेत. तर अमित शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. ३१ मे २०२१ रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन संपल्यानंतर पुढील १५ दिवसांतच या चित्रपटाचे उर्वरीत चित्रीकरण पूर्ण करायचे असा दिग्दर्शक अमित शर्मा यांचा मानस होता. मात्र आता त्यावर चक्रीवादळाने पुरते पाणी फेरले आहे. दरम्यान सेटचे नुकसान झाले असताना केवळ आर्थिक नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही हे सुदैवच म्हणावे लागेल.