हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आसाममधील पूर परिस्थिती रविवारी आणखी गंभीर झाली असून पूरात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. २३ जिल्ह्यातील ९ लाखांपेक्षा अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) ही माहिती दिली आहे. त्यांच्या रोजच्या पूर अहवालानुसार धेमाजी जिल्ह्यातील जोनाई परिसरातील तसेच उदलगुरी जिल्ह्यातील प्रत्येकी एक व्यक्ती मृत झाली आहे. या दोन मृत्युंसह यावर्षी पुरामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या १८ झाली आहे. एएसडीएमए च्या अहवालानुसार धेमाजी, लखीमपूर, बिश्वनाथ, उदलगुरी, दरंग, नलबरी, बरपेटा, बोंगागांव, कोकराझार, धुबरी, दक्षिण साल्मारा, गोलपारा, कामरूप, मोरीगाव, होजई, नागगाव, गोलाघाट, जोरघाट, माजुली, शिवसागर, दिब्रुगड, तिनसुकीया आणि पश्चिम कार्बी अँगलॉँग या जिल्ह्यांमध्ये ९.२६ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.
बारपेटा जिल्ह्यात सर्वाधिक १.३५ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. धेमाजी जिल्ह्यात जवळपास १ लाख तर नलबारी जिल्ह्यात सुमारे ९६,००० लोकांना या नैसर्गिक आपत्तीमुळे फटका बसला आहे. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, नागरी संरक्षण आणि अंतर्देशीय जलवाहतूक विभागाने मिळून ५ जिल्ह्यातील साधारण ९,३०३ लोकांना बाहेर काढले आहे. शनिवारपर्यंत राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये पुरामुळे ४.६ लाख लोक प्रभावित झाले होते. सद्यस्थितीत २,०७१ गावे पाण्याखाली असून ६८,८०६.७३ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. अधिकरी सध्या १२ जिल्ह्यांमध्ये १९३ मदत शिबिरे राबवत आहेत. जिथे २७,३०८ लोकांना निवारा देण्यात आला आहे.
आतापर्यंत अधिकाऱ्यांनी १,२०६.३२ क्विंटल तांदूळ, डाळ, आणि मीठ तसेच २,१९५.९२ लिटर मोहरीचे तेल यासोबतच इतर जीवनावश्यक वस्तू जसे की, लहान मुलांचे खाद्य, स्नॅक्स, पिण्याचे पाणी, दूध, बिस्कीट पुढे, डासांची कॉईल वितरित केली आहे. गुवाहाटी, जोरहाटमधील निमटीघाट, सोनीतपूरमधील तेजपूर, गोलपारा मधील गोलपारा शहर आणि धुबरी जिल्ह्यातील धुबरी शहर या परिसरातून ब्रम्हपुत्रा नदी रौद्ररूप धारण करून वाहत आहे. एएसडीएमएने अहवालात काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील १८३ शिबिरांपैकी ८२ शिबिरांना पुराचा फटका बसला आहे. तसेच पुरामुळे १५,२७,८३२ प्राणी आणि पोल्ट्रीचे नुकसान झाल्याचे म्हंटले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.