औरंगाबाद – शहरातील शिवाजीनगर परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगाराने एका महिलेसह पोलिस उपनिरीक्षकांच्या अंगावर वाहन घालत ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. शेख जावेद ऊर्फ टिप्या शेख मकसूद (वय ३२, रा. विजयनगर चौक, गारखेडा परिसर) असे आरोपीचे नाव आहे. एकंदरीतच या घटनेमुळे जर शहरात जनतेचे रक्षण करणारेच असुरक्षित असतील तर सर्वसामान्यांचे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सीताराम केदारे हे तपासाच्या निमित्ताने शिवाजीनगर येथे गेले होते. त्यावेळी शेख जावेद हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता, लोकांना धमक्या देत शिवीगाळ करत होता. त्याचवेळी त्याने त्याची स्कार्पिओ जीप (एमएच-२६, व्ही-०९०९) रिव्हर्स पद्धतीने एका होमगार्ड महिलेच्या अंगावर घातली, प्रसंगावधानामुळे यातून महिला बचावली. मात्र त्याचवेळी उपनिरीक्षक केदारे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांनाही शिवीगाळ करत त्यांच्याही अंगावर वाहन घालत ठार मारण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर शेख जावेद हा भरधाव वेगाने पळून गेला. शेख जावेद ऊर्फ टिप्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उपनिरीक्षक केदारे यांनी सांगितले. या प्रकाराने दुकानदारांनी दुकाने बंद करून घेतले. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.