हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : बार व हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळावी म्हणून राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी पत्र लिहीत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी केली. या मागणीवरून आता आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. “पवार साहेब, ज्याप्रमाणे बारमालक व हॉटेल मालकांचे प्रश्न जाणून घेतले. त्यांच्या प्रश्नांची दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्रही लिहले. त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मागणींकडेही लक्ष द्यावे. शेतकरी काबाड कष्ट करणारा आहे. त्याला गांजा लावण्याचीही परवानगी द्यावी, असेही एक पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहावे कारण या राज्याला आरोग्याची गरज नसून दारूची आहे,” अशा शब्दात खोत यांनी खासदार पवार यांना टोला लगावला आहे.
आमदार खोत खासदार पवारांकडे मागणी करताना म्हणाले आहेत कि, राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार ज्याप्रमाणे बारमालक व हॉटेल मालकांचे प्रश्न जाणून घेतले. त्याप्रमाणे आता राज्यातील काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. कोरोना व लॉकडाउनच्या संकटामुळे सर्वसामान्य शेतकरी यांच्या शेतीमालाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतीच्या मालाला हि भाव नाही. अगोदरच अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेती उत्पादनाचे प्रचंड नुकसान होत असून उभी पिके नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
” राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान कधीही न भरून येणारे आहे. त्यांच्यासाठीही आपण सहानुभूती दाखवावी. ज्याप्रमाणे बार व हॉटेल मालकांसाठी आपण मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी केली. त्याप्रमाणे आता राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात गांजा लावता यावा. जेणेकरून त्यांना त्यातून आर्थिक फायदा घेता येऊ शकेल. यासाठीहि मुख्यमंत्र्यांकडे मागणी करावी,” असाही टोला यावेळी खोत यांनी लगावला आहे.