सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
खंडणी, चोरीसारखे गुन्हे नावावर असलेल्या नवनाथ ज्ञानू लवटे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या खूनप्रकरणी पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. योगेश दिलीप शिंदे असे संशयिताचे नाव असून घटनेवेळी तो पूर्णपणे नशेत होता. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यास रूग्णालयात दाखल केले असलेतरी तो नशेतच असल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत. त्यामुळे या खूनाचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
शनिवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास कॉलेज कॉर्नरजवळील एका कॅफे हाऊससमोर नवनाथ ज्ञानू लवटे याचा धारदार हत्याराने आठ वार करून खून करण्यात आला होता. लवटे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्यावर खंडणी, चोरीसारखे गुन्हे होते. शनिवारी सायंकाळी कॉलेज कॉर्नरजवळील गुरूदत्त रानडे अपार्टमेंटमधील एका कॉफी हाऊससमोर संशयित व मृत लवटे समोरासमोर आले. तिथे लवटे याच्यावर संशयिताने वार करून त्यास गंभीर जखमी केले होते. शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सुत्रे हालवत यातील संशयित योगेश शिंदे या संशयितास ताब्यात घेतले होते. खूनाच्या घटनेवेळी व पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून तो पूर्णपणे नशेत आहे. पोलिसांनी त्यास उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. याठिकाणीही त्याने गोंधळ घातला. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतरच पोलीस त्याचा तपास करणार आहेत. त्यामुळे अद्यापतरी या खूनाचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी दुसऱ्या सुत्रांच्या आधारे खूनाच्या कारणाचा तपास सुरू ठेवला आहे.