औरंगाबाद – जगभरात धूमाकूळ घालत असलेला ओमिक्रॉन आता मराठवाड्यातही हातपाय पसरवताना दिसत आहे. लातूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद पाठोपाठ आता नांदेड जिल्ह्यात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना हदगाव उपजिल्हा रुग्णालयात भरती करून कोरोना पॉझिटिव्ह अहवाल जिनोम सिक्वेंसिंगसाठी पुणे येथे पाठविले होते. या तीन रुग्णांपैकी दोघांचे अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे प्रशासनाने आज कळविले आहे.
मागील पंधरवाड्यात दक्षिण आफ्रिकेसह विविध देशातून जिल्ह्यात आलेल्या जवळपास 302 नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी हिमायतनगर तालुक्यातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यानंतर या तिघांनाही हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरणात ठेवले होेते. या तिन्ही रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत अहवाल पाठविण्यात आले होते. त्यानंतर संपर्कातील सर्वच व्यक्तींची कोरोना तपासणी करून त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले होते. परंतु संपर्कातील सर्व जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता.
दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या तीनपैकी दोघांचे अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे सोमवारी पुढे आले आहे. त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना व प्रशासन सतर्क आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीळकंठ भोसीकर यांनी केले आहे.