औरंगाबाद – राज्याचे निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी काल राज्यातील 105 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. यात मराठवाड्यातील 23 नगर पंचायतींचा समावेश आहे. या नगरपंचायतीने साठी 21 डिसेंबर रोजी मतदान तर 22 डिसेंबरला मतमोजणी होणार असून संबंधित नगरपंचायतीच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू केली आहे.
या निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढवणार या उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर कोवीडसंदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करुन या निवडणुकांचा कार्यक्रम राबवावा. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने निर्मित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई करावी असे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मदान यांनी दिली आहे.
या निवडणुकांसाठी 1 ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. यादरम्यान 4 व 5 डिसेंबर रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. तर 21 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. दुसऱ्या दिवशी 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे.
मराठवाड्यातील खालील नगरपंचायतीची निवडणूक –
सोयगाव, बदनापुर, जाफराबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित), पालम, केज, शिरूर- कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, जळकोट, चाकूर, देवनी, शिरूर- आनंतपाळ, वाशी, लोहारा बु., नायगाव, अर्धापूर, माहूर, सेनगाव, औंढा- नागनाथ