शहरातील ‘या’ केंद्रांवर मिळणार 16 तास लस

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यामुळे प्रशासनाने सक्तीचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून लसीकरण केंद्रावर लोकांच्या रांगा लागत आहेत. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेऊन आता शहरातील दहा ठिकाणी सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या वेळेनुसार लस घ्यावी अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

याविषयी बोलताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, सध्या शहर व जिल्ह्यात मिळून दररोज 37 हजार लोकांना लस देण्यात येत आहे. शहरासह ग्रामीण भागातही लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लस घेण्यासाठी आल्यानंतर रांगेत जास्त वेळ थांबावे लागू नये, म्हणून लसीकरणाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे.

खालील केंद्रावर मिळणार 16 तास लस –
कैसर कॉलनीतील दोन ठिकाणी, सिल्कमिल कॉलनीत 2 केंद्रांवर, सिडको एन-8 हॉस्पिटल, बीबी का मकबरा, जवाहर कॉलनी, आरिफ कॉलनी, घाटी व जिल्हा रूग्णालयात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत लस घेता येईल. तसेच आता तालुक्याची ठिकाणी व जिल्ह्यातील मोठ्या गावातही लसीकरणाचा वेळ वाढवून मिळणार आहे.