हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्व स्तरातून मागणी होऊ लागली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहलेले पत्र काल राज्यपाल भगतसिग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच आरक्षणप्रश्नी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. “मराठा समाजाचे आरक्षण मजबूत करायचे असेल तर दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे,” अशी मागणी बागडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली.
यावेळी हरिभाऊ बागडे म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. या समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं असेल आणि ते अधिक मजबूत करायचं असेल तर केंद्रातील मागास वर्ग आयोगाकडे पाठविण्यात येणाऱ्या अहवाला अगोदर दोन दिवसांचं विशेष अधिवेशन घ्यावं. तसेच या अधिवेशनात राज्य मागास वर्ग आयोगाची नेमणूक करावी, तसेच या आयोगामार्फत तयार केलेला अहवाल स्वीकारून तो केंद्रीय आयोगाला पाठवावा.”
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आता आपल्या हालचाली वाढवल्या असून त्यांनी राज्यपालांना पत्र देत केंद्रीय मागास वर्ग आयोगाकडून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आघाडी सरकारने हा निर्णय घेतल्याने आता भाजपमध्ये आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले जातंय. यामध्ये महाविकास आघाडी सरकारला विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांनी पर्याय सुचवलं असून दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणीही केली आहे.