जळगाव । भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशा वेळी भाजपच्या नेत्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिल्यानंतर स्वत: खडसे यांनी आज याविषयी खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत आपण कोणताही निर्णय घेतलेला नाही. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याला तसा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही, असे स्पष्टीकरण एकनाथ खडसे याांनी दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत खडसे यांनी सांगितले की, ‘गेल्या २ महिन्यांपासून मी आजारपणामुळे मुक्ताईनगरातचं आहे. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा आहे. याआधी शिवसेना आणि काँग्रेसच्या प्रवेशाचीही चर्चा होती. मात्र, मी अजून पक्षांतराबाबतचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसा काही निर्णय घेतला तर तो मी स्वतः जाहीर करेन, असेही खडसेंनी यावेळी सांगितले.
दरम्यान, एकनाथ खडसेंनी यांनी गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला केला होता. फडणवीस यांनी आपल्याला त्रास दिला, असा जाहीर आरोप त्यांनी केला होता. पक्षाने अन्याय केल्यामुळे पक्षात राहू नये, असा सूरही त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. ते शिवसेनेत जाणार की राष्ट्रवादीत जाणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेना नेते तथा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले होते. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही खडसे पक्षात आल्यास स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्यात येऊन आढावा घेणार होते. मात्र, आता पक्षाचे नेते शरद पवारच आढावा घेत असल्याने या बैठकीत काय निर्णय होतो? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.