व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धनगर आरक्षणावर तोडगा नाहीच!! सरकारने मागितली 2 महिन्यांची मुदत; आंदोलक भूमिकांवर ठाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणानंतर आता राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. गेल्या 16 दिवसांपासून, धनगर समाजाला एसटी संवर्गात समाविष्ट करावं यासाठी धनगर समाजाकडून आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनादरम्यान काही उपोषणकर्त्यांच्या तब्येती खालावत चालल्या आहेत. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी तातडीने बैठक बोलावली होती. परंतु आजच्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत तोडगा निघालेला नाही. सरकारने धनगर आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आणखीन दोन महिन्यांची मुदत मागितली आहे.

आज धनगर  आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह धनगर समाजाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत दोन्ही बाजूंनी चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी दोन ते तीन महिन्यांची वेळ मागितली. त्यामुळे पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा प्रश्न टांगणीला लागला आहे.

मुख्य म्हणजे, सरकारने दोन ते तीन महिन्यांचा वेळ मागितल्यानंतर धनगर समाजाने उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत आरक्षणाचा मुद्द्यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका धनगर समाजाने मांडली आहे. गेल्या 16 दिवसांपासून धनगर समाजाला एसटी संवर्गात समाविष्ट करावं यासाठी आंदोलन सुरू आहे. आता हे आंदोलन सरकारचा निर्णय येईपर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.