कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड :-मंगळवार 20 व बुधवार 21 रोजी ओगलेवाडी येथे स्वयंस्फुर्तीने पुकारण्यात आलेल्या जनाता कर्फ्यूमध्ये ओगलेवाडीला लागुनच असलेले विरवडे तसेच राजमाची, बाबरमाची व वनवासमाची ही चार गावेही सहभागी होणार असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने यांनी दिली.
सदाशिवगड विभागातील 17 गावांची बाजारपेठ असलेल्या ओगलेवाडी, हजारमाची गावात कोरोना बाधितांची संख्या झपाटयाने वाढत आहेत. सध्या या ठिकाणी 41 ऍक्टिव्ह रूग्ण आहेत. यामुळे गंभिर परीस्थीती झाली असल्याने हजारमाची ग्रामस्तरीक कोरोना दक्षता समितीने तातडीची बैठक घेऊन ही साखळी तोडण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना बाधितांची साखळी तोडण्यासाठी मंगळवार व बुधवार दोन दिवसांचा स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचे जाहीर केले आहे. ओगलेवाडीच्या मुख्य चौकाला लागुनच विरवडे ग्रामपंचायतीची हद्द आहे. ओगलेवाडीची भाजी मंडई विरवडे ग्रामपंचायत हद्दीत भरते तर करवडी फाटयापासुन ते ओगलेवाडी चौक व एमएसईबी रस्त्याच्या उत्तर बाजुची सर्व दुकाने विरवडे हद्दीत येतात. त्यामुळे विरवडे ग्रामपंचायतीलाही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
विरवडे ग्रामपंचायत हद्दीतील या भागातही मोठया प्रमाणात कोरोना बाधित सापडत असल्याने विरवडे ग्रामपंचायतीनेही ओगलेवाडी जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे चंद्रकांत मदने यांनी सांगीतले.
ओगलेवाडी परीसरातील राजमाची, वनवासमाची व बाबरमाची या गावांतील ग्रामस्थांचीही बाजारपेठ व भाजी मंडईच्या निमित्ताने ओगलेवाडीत मोठी वर्दळ असते. त्यामुळे या गावातही कोरोनाचा धोका वाढु शकतो. त्यामुळे या तिन गावांनीही जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे चंद्रकांत मदने यांनी सांगीतल. त्यानुसार आता मंगळवारी हजारमाची, ओगलेवाडीसह विरवडे, राजमाची, वनवासमाची व बाबरमाचीत स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.
कोरोनाचा प्रसार झपाटयाने वाढत आहे. रूग्णालयात बेड मिळत नाहीत. तर ऑक्सिजन व रेमडिसीव्हर सारख्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरीकांनी स्वतांची काळजी घ्यावी. तसेच सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्रात 45 वर्षावरील सर्व नागरीकांनी लसिकरण करूण घ्यावे. गर्दी टाळावी असे आवाहनही पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने यांनी केले आहे.