महावितरणच्या वाहनावर चोरांचा डल्ला; भरदिवसा दोन लाख लंपास

औरंगाबाद – वैजापुरातील महावितरणच्या कार्यलायसमोरील वाहनातून दोन लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या वीजबिलापोटी वसूल केलेली ही रक्कम होती. ही रक्कम महावितरणच्या कार्यालयासमोरील वाहनात होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास वाहन चालक आणि कर्मचारी ही रक्कम वाहनात ठेवूनच चहा प्यायला गेले होता. हाच बेजबाबदारपणा कर्मचाऱ्यांना भोवला आणि चोरट्यांनी वाहनाची काच फोडून त्यातून सदर रक्कम लंपास केली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव मोइन हे महावितरण कंपनीत तंत्रज्ञ- वायरमन म्हणून कार्यरत आहेत. तालुक्यातील महालगाव विभागाअंतर्गत येणाऱ्या भगूर, एकोडीसागज, बल्लाळीसागज या गावातील वीज बिलांच्या रकमेच्या वसुलीसह दुरुस्तीची कामे मोइन करतात. 15, 16 जानेवारी या दोन दिवसात सदर तीन गावांतील शेतकऱ्यांकडे असलेल्या कृषीपंपांच्या वीजबिलापोटी मोइन यांनी एक लाख 97 हजार रुपयांची वसुली केली होती. ही रक्कम वसूल केल्यानंतर ते वैजापूर येथे आले. शहरातील विश्वकल्याण पतसंस्थेत रक्कम भरण्यासाठी गेले मात्र तेथील सर्व्हर डाऊन असल्याने त्यांनी ती रक्कम वाहनातील डॅशबोर्डमध्ये ठेवून ते नंतर वाहनासह याच रस्त्यावरील महावितरण कार्यालयासमोर गेले. त्यानंतर वाहन उभे करून ते त्यांच्या इतर सहाकाऱ्यांसह चहा पिण्यासाठी गेले. साधारणतः अर्ध्या तासानंतर मोईन वाहनाजवळ आले असता त्यांना एका बाजूच्या दरवाजाची काच त्यांना फोडलेली दिसली. याशिवाय डॅशबोर्डमधील ठेवलेली रक्कम गायब झालेली आढळली. याप्रकरणी उद्धव मोइन यांनी चोरट्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, महावितरणच्या कार्यालयासमोरील वाहनातून खरंच ही रक्कम चोरीला गेली की चोरीचा बनाव करण्यात आला आहे, यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला. एकूणच वीजबिलाची ही रक्कम वाहनात ठेवून चहा प्यायला जाणे वायरमनला चांगलेच महागात पडल्याचे दिसून येत आहे.