नवी दिल्ली । जर आपण सोने खरेदी करणार असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आजपासून म्हणजेच 15 जूनपासून सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आपण सोने खरेदी करणार असाल तर त्यापूर्वीचे नियम जाणून घेणे महत्वाचे आहे. केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर बीआयएस हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. 15 जूनपासून सर्व ज्वेलर्सना फक्त बीआयएस प्रमाणित दागिन्यांची विक्री करणे बंधनकारक आहे.
केंद्र सरकार सोन्याच्या हॉलमार्किंगसंदर्भात गेल्या दीड वर्षांपासून योजना आखत आहे आणि आजपासून हा आदेश देशभरात लागू होत आहे. या आदेशाची अंमलबजावणी यापूर्वीही होऊ शकली असती, परंतु देशात कोरोना साथीचा प्रसार झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. आपल्याला हा नियम काय आहे आणि सामान्य लोकांवर त्याचा कसा परिणाम होईल याबद्दल तपशीलवार जाणून घेउयात.
गोल्ड हॉलमार्किंग म्हणजे काय?
केंद्र सरकारने म्हटले आहे की, सोन्याच्या हॉलमार्किंग अंतर्गत देशातील सर्व सोन्याच्या व्यापाऱ्यांनी सोन्याचे दागिने किंवा कलाकृती विकल्याबद्दल बीआयएस मानदंडांची पूर्तता केली पाहिजे, जे हे निकष पाळत नाहीत अशा व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
तुरुंगवास होऊ शकेल
जर कोणी शासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन केले नाही तर त्याला बीआयएस कायदा 2016 च्या कलम 29 नुसार एक वर्षाची शिक्षा किंवा 1 लाखाहून अधिक दंड अशी शिक्षा होऊ शकते.
सोन्याचे किती कॅरेट हॉलमार्क केले जातील?
14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे हॉलमार्किंग केले जाईल.
घरात असलेल्या सोन्याचे काय होईल?
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात ठेवलेल्या सोन्याचे काय होईल? हा प्रश्नही आपल्या मनात येत असेल तर हे जाणून घ्या की हॉलमार्किंगचा हा नियम सोन्याचे दागिने विकणाऱ्या ज्वेलर्सला लागू होईल. ग्राहक हॉलमार्कशिवाय आपले दागिने विकू शकतात.
या नियमाचा काय फायदा होईल?
सरकारच्या या पावलामुळे सोन्याच्या शुद्धतेचा पुरावा सहज देता येईल. याचा पुरावा मिळाल्यास हॅण्डक्राफ्ट गोल्ड मार्केटलाही चालना मिळेल. यासह दागिन्यांचा उद्योगही विस्तारेल. सध्या देशभरातील 234 जिल्ह्यात 892 हॉलमार्किंग केंद्रे कार्यरत आहेत. 28,849 बीआयएस रजिस्टर्ड ज्वेलर्स हॉलमार्किंग करतात. तथापि, आता ही संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा