नवी दिल्ली । आयपीएलच्या इतिहासात असे अनेक प्रसंग घडले जेव्हा खेळाडू 99 धावांवर बाद झाले आणि केवळ एका धावाने आपले शतक गमावले. विराट कोहली आयपीएलमध्ये 99 धावांवर धावबाद झालेला पहिला फलंदाज ठरला आहे. 2013 मध्ये दिल्ली डेअर डेव्हिल्स विरुद्ध त्याच्याबरोबर हे घडले होते. पण या स्पर्धेच्या या मोसमात आणि आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा असे घडले, जेव्हा एखाद्या फलंदाजाला नाबाद 99 धावांवर माघारी परतावे लागले.
आयपीएलच्या इतिहासातील मयंक अग्रवाल हा तिसरा फलंदाज आहे. आयपीएलच्या 14 व्या सत्रातील 29 व्या सामन्यात पंजाब साठी मयंक दिल्ली कॅपिटलच्या विरूद्ध 99 धावांवर नाबाद राहिला. शेवटच्या बॉलपर्यंत तो मैदानावर उभा होता. शतक पूर्ण करण्यासाठी त्याला अवेश खानच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारायची गरज होती, परंतु त्याने चौकार मारला आणि तो 99 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय आयपीएलच्या इतिहासात सुरेश रैना आणि ख्रिस गेल हे देखील असे फलंदाज आहेत जे 99 धावांवर नाबाद राहिले आहेत.
एका धावेने शतक हुकणारा रैना पहिला खेळाडू
आयपीएल 2013 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना चेन्नई सुपर किंग्जचा स्टार सुरेश रैना एका धावेने शतक हुकणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने 52 चेंडूत नाबाद 99 धावा केल्या होत्या. या शानदार खेळीत रैनाने 11 चौकार आणि 3 षटकार लगावले. शेवटच्या चेंडूवर रैनालाही एका षटकाराची गरज होती पण तो चौकार ठोकू शकला. चेन्नईने हा सामना 77 धावांच्या फरकाने जिंकला.
99 धावांवर नाबाद राहिलेल्या फलंदाजांच्या लिस्टमध्ये कॅरेबियन स्टार ख्रिस गेलचे नाव दुसरे आहे. ख्रिस गेल 2019 मध्ये मोहाली येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 99 धावांवर नाबाद राहिला होता. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 5 षटकार लगावले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा