पुण्यातील Google चे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात असलेले गुगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात कोरेगाव पार्क येथबॉम्ब असल्याचा फोन मुंबईतील गुगलच्या कार्यालयात आला होता. यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली. मात्र, कोणत्याही प्रकाराची बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली नाही. पोलिसांनी या प्रकरणी एकाला हैद्राबाद येथून अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील मुंढवा परिसरातील पुनावाला इमारतीमध्ये शेवटच्या मजल्यावर गुगलचे ऑफिस आहे. दोन महिन्यांपूर्वीच गुगलचे हे ऑफिस सुरु करण्यात आले होते. मात्र, मुंबईत असलेल्या गुगलच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने फोन केला. आणि पुण्यातील गुगलच्या ऑफिसखाली बॉम्ब ठेवला असल्याचे सांगितले. माहिती मिळताच तात्काळ मुंबईच्या गुगल ऑफिसने पुणे पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर मुंढवा पोलिसांनी तात्काळ गुगलच्या इमारतीमध्ये जाऊन तपास सुरु केला. मात्र, तपासामध्ये कोणतीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळली नाही.

दरम्यान, धमकीचा फोन आल्यांतर मुंबईच्या बीकेसी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपास करत हैद्राबाद येथून एकाला अटक केली आहे. बीकेसी पोलिसांनी हैद्राबाद येथील पणयम बाबू शिवानंद नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीअंती पोलिसांनी शिवानंदविरोधात 505 (1) (ब) व 506 (2) अंतर्गत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शिवानंदने मुंबईच्या गुगल ऑफिसमध्ये फोन करत पुणे गुगलच्या ऑफिसमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती.