हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सद्य स्थितीत राजकिय वर्तुळात मोठ मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. आज सकाळीच कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन करुन ही धमकी दिल्याची माहिती आली. यानंतरच आता मंत्री धनंजय मुंडे यांना देखील धमकीचा फोन येऊन गेल्याची मोठी बातमी समोर आली आहे. यावेळी मुंडे यांना धमकी देत लाखो रुपये देखील मागण्यात आले आहेत.
घडलेल्या प्रकाराची तक्रार मुंडे यांनी पोलिस ठाण्यात नोंदवली असून आता पोलिसांकडून याबाबती प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीने मुंडेंना फोन करुन धमकावले. तसेच ‘५० लाख रूपये द्या अन्यथा मी तुम्हाला जीवे मारेन अशी धमकी त्यांना देण्यात आली. यानंतरच त्यांनी त्वरीत पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार नोंदवली. यापूर्वी छगन भुजबळ यांनाही अशाच प्रकारची धमकी आल्याने चर्चाना उधाण आलं आहे.
सध्या पोलिस या सर्व घडलेल्या प्रकाराचा शोध घेत आहेत. तसेच छगन भुजबळ यांना मिळालेल्या धमकीचा आणि या धमकीचा काही संबंध आहे का याचाही तपास करीत आहेत. मात्र या दोन्ही नेत्यांना मिळालेल्या धमकीमुळे राजकिय वर्तुळात खळबळ माजली आहे.दरम्यान धनंजय मुंडे यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. अश्यातच त्यांना आलेल्या धमकीच्या फोनमुळे आणखीन वातावरण तापले आहे.




