पोलिसांनाच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी

बीड प्रतिनिधी – मारहाण प्रकरणात ताब्यात घेऊन ठाण्यात आणल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत पोलिसाला शिवीगाळ करून धमकाविल्यानंतर पुन्हा मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर दोन अनोळखींनी पोलिसाला दमदाटी केली. याच पोलिसाच्या घराच्या आवारात चिठ्ठी फेकून थेट जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दुचाकी जाळण्याचा प्रयत्न केला. घरावर दगडफेक करून खिडकीची काचही तोडली. बीड शहरातील शिंदेनगरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, जालिंदर बनसोडे (रा. गोकूळ अपार्टमेंट, द्वारकानगरी, शिंदेनगर) असे त्या पोलिसाचे नाव आहे. बनसोडे हे शिवाजीनगर ठाण्यात पोलिस नाईक आहेत. दि. १४ मार्चला नगर रोडवरील एका पेट्रोलपंपावर डिलीव्हरी बॉयशी झालेल्या वादानंतर गस्तीवर असलेल्या जालिंदर बनसोडे यांनी बेलखंडी पाटोदा (ता.बीड) येथील माजी सरपंच संदिपान बडगे व अभिषेक पवळ (रा. संभाजीनगर) यांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. यावेळी मद्यधुंद संदिपान बडगेने बनसोडे यांना शिवीगाळ करत धमकावले. या प्रकरणी बीड शहर ठाण्यात ॲट्रॉसिटी, शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद आहे. यानंतर १९ मार्च रोजी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या बनसोडे यांना धमकावले.

तसेच मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अज्ञातांनी बनसोडे यांच्या घरावर दगडफेक केली. यात खिडकीची काच तुटली असून गॅलरीत दगडांचा खच पडला आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या त्यांच्या दुचाकीवर (एम. एच. २३ एएच-७२२८) पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपार्टमेंटमधील काही जणांना जाग आल्याने हल्लेखोर पळून गेला. त्याने एक चिठ्ठी टाकली. त्यात असभ्य भाषेत बनसोडे व त्यांच्या कुटुंबीयांना धमकावले आहे. याबाबत बनसोडे यांनी शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद दिली असून एका अनोळखीवर गुन्हा नोंद झाला. घटनेनंतर उपअधीक्षक संतोष वाळके यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, बनसोडे यांनी स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्व्हरची मागणी केली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like