हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या सोशल मीडियाच्या युगात काहीही व्हायरल होत असते. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. त्यानंतर आता ‘गोलमाल’, ‘स्टाईल’, ‘3 इडियट्स’, ‘रंग दे बसंती’ आणि ‘एक्सक्यूज मी’ यांसारख्या हिंदी चित्रपटात अभिनय करणारा त्याचा जावई शर्मन जोशी अर्थात राजू रस्तोगी याच्या मृत्यूची अफवा पसरली आहे. त्यानंतर त्याच्या चाहत्याने त्याचा शोध सुरू केला. मात्र, या अफवेला शर्मनचे सासरे प्रेम चोप्रा यांनी फेटाळून लावत तो पूर्णपणे ठीक असल्याचे सांगितले.
नागपुरात जन्मलेला शर्मन जोशी हा गुजराती अभिनेता अरविंद जोशी यांचा मुलगा आहे. गुजराती रंगभूमीपासून सुरुवात केलेल्या शर्मनने 1999 मध्ये ‘गॉडमदर’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर शर्मनने ‘स्टाइल’, ‘रंग दे बसंती’, ‘गोलमाल’, ‘लाइन इन अ मेट्रो’, ‘ढोल’, ‘3 इडियट्स’, ‘हेट स्टोरी 3’, ‘मिशन मंगल’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. शर्मनने वयाच्या 21 व्या वर्षी प्रेम चोप्राची मुलगी प्रेरणा चोप्रा हिच्याशी लग्न केले. शर्मनची बहीण मानसी जोशी देखील एक टीव्ही अभिनेत्री आहे आणि तिने अभिनेता रोहित रॉयशी लग्न केले आहे.
शरमन जोशीने आपल्या करिअरची सुरुवात गुजराती रंगभूमीपासून केली. शर्मनचे वडील अरविंद जोशी सुप्रसिद्ध गुजराती थिएटर आणि चित्रपट कलाकार होते. शर्मनचा पहिला चित्रपट ‘गॉडमदर’ होता. 1999 साली आलेल्या ‘गॉडमदर’ सिनेमातून अभिनयाच्या विश्वात पाऊल टाकल्यानंतर 13 वर्षानंतर 2012 मध्ये रिलीज झालेल्या ‘फेरारी की सवारी’ चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसला होता.