गणपतीला फुले तोडण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा शाॅक लागून मृत्यू
कराड | तासवडे ता. कराड येथील शिंदे वस्ती शेतात गणपतीला फुले तोडण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे हे. दिर,आई व मुलगा यांचा मृतांमध्ये समावेश आहे. सुदैवाने दोघेजण बचावले आहेत. शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान सुमारे तासाभरानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेने तासवडे पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे. यामध्ये हिंदुराव मारुती शिंदे (वय-58), सीमा सदाशिव शिंदे (वय- 48), शुभम सदाशिव शिंदे (वय -23) हे मृत्यू झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तासवडे येथे शिंदे वस्ती येथे घराजवळ लागून रघुनाथ जाधव यांची विहीर आहे. तेथे विहिरीवर मोटारीचे कनेक्शन आहे. तसेच येथे गेल्या चार दिवसापुर्वी नवीन लाईन ओढण्यात आली आहे. सायंकाळी शिंदे कुटुंबितील तिघेजण फुले तोडण्यासाठी विहिरीवर गेले होते. त्या दरम्यान येथे अचानक शॉक लागल्याने तिघेजण विहिरीत फेकले गेले. विहीरीतच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तेथील रहिवाशांनी विहिरीकडे धाव घेतली. यावेळी सुदैवाने निलेश शंकर शिंदे (वय- 25) व विनोद पांडुरंग शिंदे (वय- 40) हे दोघेजण या घटनेतून सुदैवाने बचावले आहेत. सुमारे तासाभरानंतर तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
गणपतीला फुले तोडण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा शॉक लागून मृत्यू @HelloMaharashtr @AurangabadHello pic.twitter.com/zLAk1Aimsn
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) September 3, 2022
या घटनेने शिंदे वस्तीवर शोककळा पसरली आहे. रात्री मृतदेह पाण्यातून काढून शवविच्छेदनासाठी कराड येथे हलविण्यात आले. घटनेने तासवडे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान याबाबत तळबीड पोलिसांशी संपर्क साधला असता रात्री उशिरा पंचनामाचे काम सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. याबाबत पोलिस पाटील शहाजी पाटील यांनी तळबीड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.