हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत रेल्वेने घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं ३१ मार्च पर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. तर २२ मार्चनंतर ३१ पर्यंत लोकल सेवा सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
विदेशातून आलेले अनेक करोना संक्रमित प्रवासी घरी जाण्यासाठी विमान प्रवासाला बगल देत रेल्वेने प्रवास करतानाच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळं रेल्वेतील गर्दी आणि संक्रमणाचा मोठा धोका लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने रेल्वे सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या जारी केलेल्या पत्रकानुसार ३१ मार्चपर्यंत मालगाड्या वगळता सर्व पॅसेंजर गाड्या, एक्सप्रेस गाड्या, प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. तर नागरिकांना गर्दी कमी करण्याचं आवाहन सरकारने करून सुद्धा मुंबई लोकल मधील गर्दी कमी झाली नाही. त्यामुळं लोकलची गर्दी टाळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत लोकल बंद राहणार आहे. रेल्वेच्या प्रवासी सेवा आणि लोकल बंद करण्याचा निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.