आज जागतिक ब्रेन ट्युमर दिवस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या महामारीशी सर्व जग झुंजत असताना इतर आजारांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाहीच. मेंदूच्या आजाराशी संबंधित असलेला ब्रेन ट्युमर हा आजारही त्यातीलच एक. जर्मन ब्रेन ट्युमर असोसिएशनने २००० सालापासून ८ जून हा दिवस जागतिक ब्रेन ट्युमर दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या आजाराच्या पेशंटप्रति सहानुभूती दाखवणे, यांना आजारातून बाहेर पडायला मदत करणे हा मुख्य हेतू हा दिवस साजरा करण्यामागे आहे.

काय आहे ब्रेन ट्युमर? – मेंदूची गाठ म्हणजे मेंदूच्या पेशींची असामान्य वाढ. या गाठी हानीरहित (सौम्य) किंवा कर्करोगास कारणीभूत  (घातक) होऊ शकतात. मेंदूच्या आत ज्या गाठी बनतात त्यांना प्राथमिक मेंदूची गाठ म्हटले जाते. दुस-या प्रकारची गाठ किंवा मेटास्टॅटिक ब्रेन ट्यूमर, जे शरीराच्या इतर भागामध्ये कर्करोग होऊन मेंदूच्या भागाकडे सरकल्याने होतो. मेंदूतील गाठीची लक्षणे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतात उदा. गाठीचा आकार, गाठीच्या वाढीची गती आणि गाठ असलेले स्थान. मेंदूतील गाठीच्या काही प्रारंभिक आणि सामान्य लक्षणांमध्ये डोकेदुखीचे बदलते व्यवहार, वारंवार आणि तीव्र डोकेदुखी, बोलण्यातील समस्या आणि शरीराचा संतुलन राखण्यात अडचण यांचा समावेश होतो.

याची लक्षणं नक्की काय – लक्षणांचा विचार करता तीव्र स्वरूपाची डोकेदुखी, अनेक गोष्टी लक्षात ठेवता न येणे म्हणजेच विस्मृती आणि स्मृतिभ्रंशाचा त्रास, निराशा येणं, मूडमध्ये सातत्याने बदल होणं, चक्कर येणं, एकाग्रता कमी झाल्याने विचार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येणं याचा प्रामुख्याने समावेश होतो.

उपचार काय आहेत? – ब्रेन ट्युमरवर अत्याधुनिक पद्धतीचे उपचार उपलब्ध आहेत. शस्त्रक्रिया करुन मेंदूमध्ये वाढलेल्या गाठी काढून टाकता येतात. बऱ्याचदा रुग्णाची प्रतिकारशक्ती आणि शरीररचना पाहून लेझर उपचारांद्वारे मेंदूतील ट्युमर नष्ट केला जातो. रेडिओसर्जरी आणि केमोथेरपी करून, अलोपॅथीच्या विशिष्ट भागावर परिणाम करणाऱ्या गोळ्या वापरूनही ट्युमरवर इलाज करता येतो. एकूण काय आजाराचं स्वरूप गंभीर असलं तरी योग्य माहिती घेऊन त्यावरील इलाज करता येणं शक्य आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment