सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा नगरपालिकेच्या इमारतीचे भूमिपूजन झालं चागलं झालं. परंतु त्या इमारतीचा प्रस्ताव नाही, बजेटमध्ये तरतूद नाही, कसलीही तांत्रिक मान्यता नाही. पण नारळ फोडून, गाणी गावून लोक मोकळी झाली. गाणी गाण्यापेक्षा आता तुम्ही सातारकरांना नेमकं सांगा, काय बाय सांगू कसगं सांगू तुम्हांला नक्की कशाची लाज वाटली ते सांगा म्हणत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी छ. खा. उदयनराजे भोसले यांच्यावर खरमरीत टीका करत सर्वत्र खिल्ली उडवली.
गोडोली जकात नाका ते अजंठा हॉटेल परिसरातील रहिवाशांना आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नाने नवीन पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चक्क शिवेंद्रराजे भोसले यांनी जेसीबी चालवला. या कार्यक्रमात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीचे नेते खा. उदयनराजे यांच्यासह अॅड. डी. जी. बनकर यांच्यासह नेत्यांचा समाचार घेतला.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, रडारडी आणि पप्या बास आता त्यापेक्षा तुम्ही विकासकामे सांगा. आता पाया पडतील, गळ्यात पडतील परंतु हे सर्व तात्पुरते आहे. गळ्यात पडण्याचे प्रेम हे मनापासून नाही तर निवडणुकीपुरतेच आहे. लोकांनी विकासकामे होतात की नाही ते पहावे. सातारा शहरातील हद्दवाढीचे आम्ही काम केले. केवळ निवडणुकीपुरते तुमच्यासमोर आलो नाही. भ्रष्टाचारमुक्त पालिकेचा कारभार करणार होते, त्याऐवजी टक्केवारी आणि बिले काढायची, असा झाला आहे.