हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावर तोडगा निघणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
परीवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सिल्वर ओक येथे 10 मिनटे चर्चा झाली. या बैठकीत ST कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. या प्रकरणात समन्वयाने सुवर्णमध्य काढत संप कसा मिटवता येईल या संदर्भात चर्चा झाल्याची माहीती मिळतेय. ST कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्र्यांना काही पर्याय सूचवले आहेत. या पर्यांयांचा एक सुधारीत प्रस्ताव परिवहन मंत्रालय आज तयार करत आहे.
काल राज ठाकरेंनी घेतली होती पवारांची भेट-
दरम्यान, काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन एस.टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. विविध सरकारी मंडळे किंवा उपक्रमांमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन यापूर्वीच लागू झाला आहे. याच धर्तीवर एस.टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यास त्यांच्या वेतनात वाढ होऊ शकेल, असे राज ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले. एस.टी. कर्मचाऱ्यांची सेवा सरकारी सेवेत विलीनीकरणाची मागणी असली तरी हा निर्णय घेण्यास कालावधी लागू शकतो. त्यापेक्षा सातवा वेतन आयोग लागू केल्यास कर्मचाऱ्यांना तात्काळ दिलासा मिळेल, अशी भूमिका मनेसेकडून मांडण्यात आली आहे