अगरताळा : वृत्तसंस्था – देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशात दिवसाला ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र तरीसुद्धा काही लोक याकडे गांभीर्याने न बघता सर्रास नियम पायदळी तुडवत आहेत. असाच एक लग्न सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा पुरता फज्जा उडाला आहे.
https://twitter.com/AwanishSharan/status/1387090229882810368
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्रिपुरामध्ये सध्या नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. नाईट कर्फ्यू लागू असतानासुद्धा पश्चिम त्रिपुरा येथे एका ठिकाणी रात्री उशिरापर्यंत विवाह सोहळा सुरू होता. त्यानंतर जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांनी त्या ठिकाणी पोहोचत त्या लोकांवर कारवाई केली. शैलेश कुमार यादव यांनी त्या ठिकाणी पोहोचताच अनेकांना हॉलबाहेर जाण्यास सांगितले आणि त्यानंतर त्यांनी नवरदेवाला थेट धक्के मारून बाहेर काढले. या कारवाईनंतर त्यांनी हॉल सील करण्याचे आदेश दिले.
वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव एका हॉलमध्ये जाऊन लग्न सोहळा थांबवताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी लोकांना चांगलेच सुनावले आहे. यावेळी त्यांनी जी भाषा वापरली त्यावर आता टीका करण्यात येत आहे. शैलेश यांनी नवरदेवाला धक्के मारून बाहेर काढले आहे. त्यांनी ३० जणांवर आपत्ती प्रतिबंधात्मक अधिनियमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली. मात्र थोड्याच वेळात त्यांची सुटका करण्यात आली.