सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाला कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी देवस्थानातील सोने कर्जरूपात घ्यावे असे अपील केले होते. मात्र चव्हाण यांच्या या विधानानंतर समाजाच्या विविध स्तरांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी चव्हाण यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून लोकांना दारू पाजून महसूल उभा करण्यापेक्षा देवस्थानातील सोने व्याजावर घेऊन देशासमोरील संकटावर मात करणे कधीही योग्य असल्याचे विधान केले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली मागणी अत्यंत योग्य आहे. सर्वधर्मीय देवस्थान मधील सोने 1 ते 2 टक्के व्याजाने सरकारने घ्यावे. कारण सध्या देश संकटात आहे. अशा वेळेला दारू विकून किंवा जनतेला दारू पाजून महसूल उभा करण्यापेक्षा हा पर्याय कधीही योग्यच राहील असे म्हणत देसाई यांनी आपली याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या अभ्यासू मागणीनंतर काही लोकांनी त्यांच्यावर धर्माच्या विरोधात अशा पद्धतीने टीका केली आहे. त्यांना मला एवढेच सांगायचे आहे की “पृथ्वीराज चव्हाण यांचे डोके ठिकाणावर आहे तुमचे डोके ठिकाणावर ठेवून टीका करा, देवस्थान ही कोणाच्याच बापाची खाजगी मिळत नाही ओ. यात देवाला अर्पण केलेले पैसे, सोने जे काही असते ते भक्तांनी मनोभावे अर्पण केलेले असते आणि त्याचा उपयोग जर देश संकटात असेल तेव्हा झाला तर नक्कीच देवालाही आनंद होईल असाही देसाई यांनी यावेळी म्हटले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.