ट्विटरची मोठी घोषणा ! वादाच्या पार्श्वभूमीवर बंद करणार ‘हे’ फीचर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही गोष्टीवर मत मांडण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करत असतो. त्यामध्ये फेसबुक आणि ट्विटर यांकडे युजर्सचा अधिक कल असतो. मात्र गेल्या काही काळापासून अनेक गोष्टी, घडामोडींमुळे ट्विटर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारत सरकार विरुद्ध ट्विटर हा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. भारतातसुद्धा ट्विटरमुळे अनेक वाद उद्भवले आहेत. असे असूनदेखील ट्विटर हे आजही एक प्रमुख समाज माध्यम म्हणून वापरले जाते. मात्र आता ट्विटरने फ्लिट फीचर हि सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे जागतिक स्तरावर पडसाद उमटले असून टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी या फीचरच्या बदल्यात नवी सुविधा सुरु करण्याची मागणी ट्विटरकडे केली आहे.

वादाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरने येत्या 3 ऑगस्टपासून फ्लिट फीचरची सुविधा बंद करण्याची घोषणा केली आहे. ट्विटरने ही फ्लिट फीचर सुविधा गतवर्षी भारत, दक्षिण कोरिया, इटली आणि ब्राझील या देशांमध्ये तपासणी तत्वावर सुरु केली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ही सुविधा जागतिक स्तरावर सुरु करण्यात आली. या फीचरच्या माध्यमातून युजर आपले फोटो, व्हिडीओ पोस्ट करु शकत होते आणि हे फोटो, व्हिडीओ 24 तासांनंतर आपोआपच नाहीसे होत होते.

ट्विटर काय म्हणाले?
आम्ही 3 ऑगस्टपासून फ्लिट फीचर सुविधा बंद करत आहोत, अशी माहिती ट्विटरकडून देण्यात आली आहे. याचे स्पष्टीकरण देताना सोशल मिडीया कंपनीने सांगितले की आम्ही या फीचरच्या माध्यमातून युजर्स आकर्षित करण्यात अपयशी ठरल्यामुळे ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून यावर खेद व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक स्तरावरील सर्व युजर्ससाठी ही सेवा 8 महिन्यांपूर्वीच सुरु करण्यात आली होती.

एलन मस्क यांनी जॅक डोरसी यांना केली विनंती
फ्लिट फीचर बंद करण्याबाबतचे वृत्त येताच युजर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे.ट्विटरवर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असणारे टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क हे देखील या घोषणेमुळे अस्वस्थ झालो आहे असे ट्विट केले आहे. एलन मस्क यांनी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोरसी यांच्याकडे या फिचरच्या बदल्यात नवी सुविधा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

You might also like