लसीकरणामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या दोघांना अटक

Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 ओैरंगाबाद – चित्तेगाव उपकेंद्र येथे काल (दि 20) लसीकरण मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या गोरख रामभाऊ शिंदे व निलाबाई शिंदे यांच्यावर बिडकीन पोलिस ठाण्यामध्ये आज गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी त्यांना त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे. लसीकरणाच्या राष्ट्रीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला असल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे स्वत: या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते.

या प्रकरणी इंदीरा कण्या कोकणी, आरोग्य सेविका, रा बिडकीन यांनी दिलेल्या तक्रारी नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  तक्रारी नुसार काल (दि 20) चित्तेगाव उपकेंद्र येथे फिर्यादी आणि प्रफुल्ल ताकवाले, समुदाय आरोग्य अधिकारी, सुनील जाधाव, आरोग्य सहायक आणि कृष्णा तनपुरे खाजगी नोकर यांची मिशन कवच कुंडल मोहिम अंतर्गत कोविड 19 लसीकरणाची ड्युटी होती. यावेळी सोबतचे दोन कर्मचारी येईपर्यंत कर्मचाऱ्यांनी ऑनलाईनचे रजिर्स्टेशनचे काम सुरू ठेवले. हे काम सुरू असताना सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपी गोरख शिंदे हे लाईन तोडून पुढे येत म्हणाले की, माझे लसीकरण लवकर करा मला कामाला जायचे आहे यावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना लसीकरणाची संगणकावर नोंदणी होत आहे थोडा वेळ लागेल असे समजावून सांगितले. मात्र गोरख शिंदे यांनी कृष्णा तनपुरे यांना मारहाण करत शिवीगाळ केला.

यावेळी फिर्यादी यांनी देखील गोरख यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने मारहाण सुरू केली. हे सुरू असतानाच गोरख यांच्या पत्नी निलाबाई शिंदे काठी घेऊन कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावुन आल्या व त्यांनी देखील लाथाबुक्यांनी मारहाण केली. या प्रकरणी गोरख शिंदे आणि निलाबाई शिंदे यांच्यावर सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी भारतीय दंड संहिता 1860 कलम 353, 323, 504 आणि 34 प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे.