औरंगाबाद – अखेर औरंगाबादेत ओमायक्राॅनचा शिरकाव झाला असून, दोन ओमायक्राॅनबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. मराठवाड्यात आतापर्यंत लातूर -1, उस्मानाबाद – 5 आणि आता औरंगाबादमध्ये – 2 असे एकूण 8 ओमायक्राॅनचे रुग्ण आढळले आहेत.
औरंगाबादेतील नातेवाइकाच्या लग्नसमारंभासाठी लंडनहून मुंबईत दाखल झालेल्या एनआरआय कुटुंबातील 21 वर्षीय मुलगी ओमायक्राॅन बाधित आढळली होती. तेथे अहवाल निगेटिव्ह आल्याने आधी आई, बहीण आणि वडील असे तिघेही औरंगाबादेत दाखल झाले. मात्र, येथे तपासणीअंती ओमायक्राॅन बाधित मुलीचे 50 वर्षीय वडील काेरोनाबाधित आढळल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली होती. ते ओमायक्राॅन बाधित आहेत की नाही, याचे निदान होण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला स्वॅब नमुना पाठविण्यात आला होता. या तपासणीचा अहवाल शनिवारी मिळाला आणि त्यातून हा व्यक्ती ओमायक्राॅनबाधित असल्याचे समोर आले.
तसेच शहरात दुबईहून औरंगाबादेत आलेला एक ३३ वर्षीय व्यक्तीही ओमायक्राॅनबाधित आढळला आहे. यामुळे आरोग्य व्यवस्था सर्तक झाली असून, नागरिकांनी घाबरून न जाता नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.