औरंगाबाद – नव्याने खरेदी केलेल्या दुकानात मालमत्ता लावण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मनपाच्या वरिष्ठ लिपिक आसह सफाई मजुराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. काझी सलामोद्दीन अरिफोद्दीन (41) आणि सय्यद शहजाद सय्यद शहरअली (48) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, काझी सलामोद्दीन हा वरिष्ठ लिपिक आहे तर शहजाद हा सफाई मजूर म्हणून महानगरपालिकेत काम करतो. या दोघांचीही नेमणूक सिल्लेखाना रोडवरील मनपाच्या वार्ड क्रं. 2 कार्यालयात आहे. तक्रारदार यांनी काही दिवसांपूर्वी नवीन दुकान खरेदी केले आहे. त्या दुकानाला मालमत्ता कर लावून घेण्यासाठी त्यांनी कार्यालयात अर्ज केला. मात्र, कर लावण्यासाठी लिपिक काझी सलामोद्दीन याने दहा हजार रुपयांची लाच मागितली.
याप्रकरणी तक्रारदार यांनी देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर अधिक कारवाईसाठी पोलिस निरीक्षक संदीप राजपूत यांनी गुरुवारी सापळा रचला त्यात काझी सलामोद्दीन व सय्यद शहजाद हे दहा हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात अडकले. त्यांना ताब्यात घेऊन क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.