न्यायालयीन लढ्याला कंटाळून माथेफिरूने जाळल्या दुचाकी

औरंगाबाद – दुचाकी जाळणाऱ्या माथेफिरुला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. अनिल ऊर्फ सोनू ज्ञानेश्‍वर दाभाडे (वय 23, रा. नागसेननगर, उस्मानपुरा) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याला 25 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कोर्ट केस मुळे न्यायालयात चकरा माराव्या लागत असल्याने हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

सागर कचरु आढाव (रा. एकनाथनगर, उस्मानपुरा) याने फिर्याद दिली. त्‍यानुसार, १७ जानेवारी रोजी रात्रीसाडे दहा वाजेच्‍या सुमारास सागरने आपली दुचाकी (क्रं. एमएच-20 ईएस- 2867) व ॲक्टीव्हा (क्रं. एमएच-20 डीएल- 1778) घरासमोर उभी केली होती. त्‍यावेळी माथेफिरुने सागर आढाव याच्‍या दुचाकीसह त्‍यांच्या शेजारी राहणाऱ्या संजय नेरकर यांच्‍या दुचाकीला (क्रं.एमएच- 20 आर- 8876) आग लावून पसार झाला. पहाटे तीन वाजेच्‍या सुमारास दुचाकीला आग लागल्‍याचे सागरला निदर्शनास आले. प्रकरणात उस्‍मानपुरा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून आरोपी अनिल ऊर्फ सोनू दाभाडे याला अटक केली. त्‍याने गुन्‍ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील भाग्यश्री संचेती यांनी युक्तिवाद केला. आरोपी हा सराईत गुन्‍हेगार असून त्‍याच्‍या विरोधात उस्‍मानपुरा पोलिस ठाण्‍यात तब्बल आठ गुन्‍हे दाखल आहेत. या गुन्‍ह्यात आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय, गुन्‍हा करण्‍यामागे आरोपीचा आणखी कोणता हेतू होता काय याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.