महात्मा गांधींची प्रिय धून प्रजासत्ताक दिन सोहळ्यातून हद्दपार; ‘ही’ वाजणार धून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्या वतीने भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बदल केले जात आहेत. स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवसापासून प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राष्ट्रपिता महात्मा गांधी याची आवडती धून असलेली ‘अबाईड विथ मी’ हि प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभातून वगळली असून त्याऐवजी यंदा ‘सारे जहाँ से अच्छा’ ही धून वाजवण्यात येणार आहे.

भारतीय लष्कराच्यावतीने शनिवारी एक कार्यक्रम पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभाद्वारे (बिटिंग द रिट्रीट) तिन्ही सेना दलांना आपआपल्या बराकींमध्ये परतण्याचा अधिकृत संदेश दिला जातो. या समारंभात तिन्ही सेना दले सहभागी होतात आणि पारंपरिक धून वाजवत माघारी फिरतात. या सर्व धून लष्कराच्या बॅण्डद्वारे वाजवण्यात येतात. त्यांत ‘अबाईड विथ मी’चाही समावेश होता.

‘अबाईड विथ मी’ ही पद्यरचना महात्मा गांधी यांच्या आवडत्या भजनांपैकी एक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभाच्या अखेरीस ‘अबाईड विथ मी’ची धून वाजवण्यात येत होती, परंतु यंदा ‘सारे जहाँ से अच्छा’ ही धून वाजवण्यात येईल, असे लष्कराच्या कार्यक्रम पत्रिकेत म्हटले आहे. विजय चौकात होणाऱ्या या समारंभात २६ धून वाजवण्यात येणार आहेत. त्यांत जय जनम भूमी, वीर सियाचेन, अमर चट्टान, गोल्डन अ‍ॅरोज, स्वर्ण जयंती, वीर सैनिक, जय भारती, हिंद की सेना, कदम कदम बढाए जा, ए मेरे वतन के लोगों आदी धूनचा समावेश आहे.

Leave a Comment