सांगली : हॅलो महाराष्ट्र – मिरज तालुक्यातील भोसे या ठिकाणी मित्रांनीच मित्राची हत्या करून मृतदेहाचे तुकडे कूपनलिकेत टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृताचे नाव दत्ता झांबरे असे आहे. हि घटना २७ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीच्या अमोल खामकर आणि सागर सावंत या दोन मित्रांना अटक केली आहे. मिरज ग्रामीण पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण
मृत दत्तात्रय हा 28 जुलै रोजी त्याचे मित्र अमोल आणि सागर यांच्यासोबत होता. तेव्हापासूनच दत्तात्रय गायब असल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. यानंतर दत्तात्रयचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी मयत तरुणाच्या मित्रांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता दारू पिल्यानंतर शिवीगाळ केल्याच्या रागातून आरोपींनी ही हत्या केल्याचं पोलीस तपासात कबुल केले आहे.
त्या रात्री नेमकं काय घडलं?
२७ जुलै रोजी तिघेही मिरज-पंढरपूरोडवरील भोसे गावाजवळील बंद पडलेल्या पारस पावडर कंपनीच्या शेडमध्ये गेले होते. दत्ता झांबरे याने खामकर, सावंत यांना सिगारेट आणण्यासाठी सांगितले. सिगारेट आणायला वेळ झाला म्हणून दत्ता झांबरे हा खामकर व सावंत यांच्या अंगावर कोयता घेवून धावून गेला. सागर याने दत्ता झांबरे याच्या हातातील कोयता हिसकावून घेवून झांबरे याला लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याला खाली पाडले. यानंतर दोघांनी झांबरे याला डोक्यात दगड घालून, तसेच कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरून कूपनलिकेत टाकल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.