वरकुटे- मलवडी येथील 28 वर्षीय 2 युवक अपघातात ठार : सांगोला- सांगली मार्गावरील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोंदवले | चिकमहूद ते दिघंची मार्गावरील हॉटेल विशाल जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरासमोर धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अपघातात मयत दोन्हीही तरुण हे वरकुटे-मलवडी येथील आहेत. सुशांत शांताराम जाधव (वय- 28), मंगेश शिवाजी पिसे (वय- 28, रा. वरकुटे-मलवडी, ता. माण, जि. सातारा) अशी मृत्यू झालेल्या तरूणांची नावे आहेत.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास चिकमहूद (ता. सांगोला) ते दिघंची (जि. सांगली) मार्गावर चिकमहूद शिवारातील हॉटेल विशाल जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात सुशांत जाधव हा युवक जागीच ठार झाला. तर त्यांच्या सोबत असणारा मंगेश पिसे हा गंभीर जखमी झाला होता. त्याला पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वरकुटे- मलवडी येथील हे दोघेजण त्यांच्याकडील दुचाकीवरून दिघंची मार्गे महूदकडे निघाले होते. अज्ञात वाहन चिकमहूदहून दिघंचीकडे निघाले होते. तेव्हा त्यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यात त्यांचा मृत्यू झाला. सुशांत जाधव हा फोटोग्राफी करत असून फोटोग्राफीच्या कामानिमित्त जाताना हा अपघात झाला. तर मंगेश पिसे हा मोटारसायकल मिस्त्री म्हणून काम करत होता.

यावेळी सागर जावीर, वैभव वाघमारे यांच्यासह उपस्थित नागरिकांनी तात्काळ 108 या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेला बोलावून घेतले. जखमी मंगेश पिसे यास रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सांगोलाकडे पाठविण्यात आले. अज्ञात वाहन मोटारसायकल स्वारांच्या अंगावरून व डोक्यावरून गेल्याने सर्वत्र मांस व रक्ताचा सडा पडलेला होता.

Leave a Comment