सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
साताऱ्यात काही दिवसावर सातारा नगरपालिकेची निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. त्या अगोदरच दोन्ही राजेंकडून एकमेकांवर हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान भाजपचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “चला हवा येऊ द्या” कार्यक्रमात बाईकवरून हवेतून एंन्ट्री केली होती. त्यावर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खोचक टीका केली. त्याच्या टीकेला उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही, असा पलटवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
खा. उदयनराजे भोसले यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गाडीवर बसून हवेतून येण्याचा केलेला स्टंट म्हणजे वाऱ्यावरची वरात अशी माझ्यावर शिवेंद्रराजे भोसले यांनी टीका केली आहे. त्यांना माझे सांगणे आहे की, मी त्या उंचीचा आणि त्या उंचीवर आहे. म्हणून मी स्टंट केला. आता शिवेंद्रराजे भोसले यांनी त्या ठिकाणी पोहचण्यासाठी प्रयत्न तरी करावा. अगोदरच माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही, अशी खोचक टीका खा. उदयनराजे यांनी केली.
श्वेत पत्रिका जाहीर केली जात नाही हि खंतच – उदयनराजे भोसले
यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती याच्या उपोषणाबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, खा. संभाजीराजे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला यश येणार कसे ? कोणत्याही समाजातील लोकांवर अन्याय होता कामा नये. यासाठी आर्थिक निकषावर आरक्षण दिले जाणे गरजेचे आहे. श्वेत पत्रिका जाहीर करण्याची मागणी आम्ही अनेकवेळा केली आहे. मात्र, ती जाहीर केली जात नाही हि अशी खंत भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.