कराड प्रतिनिधी ।सकलेन मुलाणी
पाच वर्षापूर्वी निवडणुकीच्या काळात विरोधकांनी एवढा चांगला अभिनय केला, तो मी याआधी कधी पाहिला नाही, बेबींच्या देठापासून तळागाळातील लोकांच्यापर्यंत नंदनवन करू अशी आश्वासने दिली. एवढा अभिनय, मी बरेच नाटके बघितली पण यांच्या अभिनयाने भारावून गेलो, मी पण प्रॅक्टीस करायला लागलो, परंतु हा विरोधकांचा अभिनय बटन दाबून मत मिळेपर्यंत होता, त्यानंतर त्यांनी तुमच्या वैचारीक मतांची त्यांनी किमंत कधीच केली नाही. निकालानंतर त्यांनी जनतेला जास्तीत जास्त गाळात घालण्याचे काम केले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केला.
कराड येथे मतदान बुथ प्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण, आ. आनंदराव पाटील, मलकापूर नगराध्यक्षा निलमताई येडगे, उपनगराध्यक्षा मनोहर शिंदे, सारंग पाटील, शिवराज मोरे, झाकीर पठाण, डॉ. इंद्रजित मोहिते, नगरसेवक फारूख पटवेगार, धनश्री महाडिक, रजनीताई महाडिक यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, घटनेने प्रत्येक व्यक्तीला अधिकार दिला आहे. कोणाचा विजय तर कोणाचा पराभव होतो. महात्मा गांधीनी यांनी एक मुलभूत विचार दिला, तो म्हणजे पंचायत राजचा विचार होय. सत्तेचे विकेंद्रीकरण केले. ज्यामुळे लोकशाही पहायला मिळणार आणि ती पाच वर्षापूर्वी पर्यंत सर्वांना मान्य होती. काही लोकांनी मन की बातच्या माध्यमातून लोकांच्या भावनेत शिरकाव केला. मतदार राजाचा विश्वासघात केला. काहीजण म्हणतात लाट आहे, मला एकच लाट माहिती आहे ती म्हणजे समुद्राची लाट आहे. मात्र सत्तेत आल्यानंतर या लोकांनी जनतेला लाटलं हे नक्की आहे. तेव्हा आता सत्तांतर केल्याशिवाय गत्यतंर नाही हे लक्षात ठेवा आणि या लोकांना हद्दपार करा.