कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पंजाब राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही लोकसभेला काँग्रेसचा एकही उमेदवार या राज्यातून निवडून येत नाही. ही नक्कीच विचार करण्यासारखी बाब आहे. देशातील मतदान प्रक्रियेबाबत सर्व पक्षांनी एकत्रित येऊन बैठक घ्यावी. याबाबत चर्चा करून योग्य त्या मार्गाने दाद मागावी. अन्यथा सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विजयी झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी कराड येथील पत्रकारांशी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले, आम्ही अमेरिकेसारखे तंत्रज्ञान क्षेत्रात जगाच्या पाठीवर प्रगत राष्ट्र जेव्हा ईव्हीएम मशीन बाबत शंका उपस्थित करते तेव्हा त्यात नक्कीच काहीतरी तथ्य आहेच. सायबर गुन्हेगारीत आपण संगणका सारखी ईव्हीएम पेक्षाही अधिक गुंतागुंतीची उपकरणे सहजासहजी हॅक केल्याचे अनेक उदाहरणे पाहिली आहेत. मग यापुढे ईव्हीएम काय चीज आहे. या ईव्हीएम यंत्रणेवर माझा विश्वास नाही.
ईव्हीएम बद्दल अनेकांनी आक्षेप नोंदवून बैलेट पेपर द्वारे मतदान प्रक्रिया राबवली जावी अशी मागणी देशभरातील अनेक पक्षांनी केली होती. मात्र या मागणीला दुर्लक्षित करण्यात आले. नोटा बंदी च्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार झाला. गेल्या पाच वर्षात देशात सुरू असलेल्या कारभाराबाबत कोणी काही अक्षेप घेतल्यास सर्व बाबी हुकुमशाहीनुसार मनमानी पद्धतीने केल्या. देशात नक्की काय चाललंय लोकशाही आहे की हुकूमशाही असा प्रश्न पडतोय असं भोसले म्हणाले.
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभा घेऊन भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले. याचा नेमका काय परिणाम साध्य झाला याबाबत पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांना विचारले असता ते म्हणाले, राज हा माझा मित्र आहे. तो खोटं बोलत नाही. त्याने राज्याच्या विविध भागात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाषणांमध्ये भाजप कारभाराबाबत केलेले वक्तव्य खरे आहे.