हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. “काहींकडून थोर महापुरुषांचा अपमान केला जात आहे. असा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा का दाखल केला जात नाही? असा सवाल उदयनराजे भोसले यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केला. तसेच सरकारने महापुरुषांचा अवमान केला तर तो देशद्रोहच ठरवावा आणि त्या प्रकारे कायद्यात तरतूदच करावी, अशी मागणी त्यांनी केली . यावेळी भावूक झालेल्या उदयनराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे, हा दिवस पाहण्याअगोदर मेलो असतो तर बरं झालं असतं असेही म्हंटले.
खा. उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यातील रेसिडेन्सी क्लबमध्ये शिवप्रेमी संघटनांची बैठक घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केली जात आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याबद्दल बेडगी प्रेम दाखवलं जात आहे. कशाला असे प्रेम दाखवता? निवडणुका जवळ आल्या कि काहीजणांना शिवराय आठवतात. काहीजण आपल्या राजकीय स्वार्थापोटी अवमानकारक वक्तव्य करत आहेत. अशा प्रवृत्ती थांबवल्या पाहिजे.
काही जणांकडून राजकीय स्वार्थासाठी शिवरायांचा वापर केला जात आहे. महाराजांबद्दल गलिच्छ प्रतिमा तयार केली जाते तेव्हा राग कसा काय येत नाही. आता जनतेनं विचार करणं गरजेचं आहे. विकृतीकरण थांबवलं नाही तर नव्या पिढीसमोर कोणता इतिहास मांडणार? महाराजांच नाव घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. राज्यापालांवर कारवाई का केली नाही? असा सवाल उदयनराजे यांनी यावेळी केला.
मी लवकरच या प्रश्नी राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. तसेच, 3 डिसेंबरला राडगडावर धरणं आंदोलन करणार असून त्यातून लोकभावना मांडणार असल्याची माहिती उदयनराजे यांनी यावेळी दिली.