हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. “पंतप्रधानांचे शेड्यूल व्यस्त असल्याने त्यांच्याशी या विषयावर बोलणं झालं नाही. मात्र, पंतप्रधान कार्यालयाला एक पत्र दिलं असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्यपाल पद हे संवैधानिक पद असल्याने त्या पदावरून हटवण्याबाबतच्या काही प्रक्रिया असतात. त्या पूर्ण करूनच राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून कारवाई केली जाते. त्यामुळे राज्यपालांवर कारवाई होईल, अशी मला आशा आहे, अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली.
भाजप खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला होता. त्यामुळे त्यांना हटवण्यासाठी 23 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं. आजही आम्ही पंतप्रधान कार्यालयाला एक पत्र दिले आहे. त्यांच्या कार्यालयात पत्रं देऊन आम्ही आमच्या भावना कळवल्या आहेत.
यावेळी उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल कोश्यारींना पुन्हा इशारा दिला. छत्रपती शिवाजी महाराज देशाची अस्मिता आहे. त्यांच्याबद्दल बोलताना मोजूनमापून बोलावं. राज्यपाल हे पद मोठं आहे. त्या पदावरील व्यक्तीने कोणत्याही महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलू नये, असे उदयनराजे यांनी म्हंटले.