हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी करत खा, उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी डेक्कन कॉलेजपासून ते लाल महालपर्यंत मूकमोर्चाही काढण्यात आला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. “काही विकृत लोकांकडून शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्ये केली जात आहेत. नुपूर शर्मा यांचं निलंबन करण्यात आलं. मात्र, राज्यपालांचं का नाही? एक गोष्ट लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचे प्रेम अजूनही कमी झालेले नाही,” अशा शब्दात उदयनराजे भोसले आपली भूमिका मांडली.
छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी लाल महाल येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आजच्या मोर्च्यात मोठ्या संख्येने शिवभक्त, संघटना सहभागी झाली आहे. आजही शिवरायांबद्दल लोकांच्या मनात आदर, प्रेम आहे हे दिसून येते. मात्र, काही विकृत लोकांकडून शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्ये केली जात आहे. कारण नसताना अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. वक्तव्य केले म्हणून नुपूर शर्मा यांचं निलंबन केले. मात्र, राज्यपालांचे का केले नाही? असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान, मोर्चामुळे वाहतुकीत काही बदल करण्यात आला आहे. तसेच सुरक्षेसाठी 7 हजार 500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.