…तर देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत; पत्रकार परिषदेत उदयनराजे आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज सातारा येथे पुन्हा पत्रकार परिषद घेतली. यावेळी उदयनराजे चांगलेच आक्रमक झाले. “जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात फक्त शिवाजी महाराज यांच्या विचाराने टिकली आहे. शिवराय जगाच्या पाठीवर एकमेव राजे आहेत ज्यांनी सर्वांचा सन्मानासाठी आयुष्य वेचले. लोकशाहीचा ढाचा छत्रपतींनी निर्माण केला. महापुरुषांचा अवमान होतं राहिला तर देशाचे तुकडे होतील. आणि देशाचे तुकडे झाले तर लोकप्रतिनिधी जबाबदार असणार आहेत, अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी सर्वपक्षीय नेत्यांवर निशाणा साधला.

सातारा येथे खा. उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात फक्त शिवाजी महाराज यांच्या विचाराने टिकली आहे. महाराजांनी सामान्यांवर होणाऱ्या अन्यायाला विरोध केला. वेगवेगळ्या पक्ष, संघटना, विचारवंत असे सर्वच जण प्रथम महाराजांचे नाव घेतात. त्यांच्या कार्याला महाराजांचेच विचार दिशा देतात. अशा महापुरुषांच्या विचारांची तोडमोड करण्याचे स्वातंत्र्य या लोकांना कोणी दिलं?

छत्रपती महाराजांच्या विचार प्रत्येकाने आपल्यापुरता घेतला, जातीपुरता घेतला. याचा परिणाम आज आपण एकमेकांकडे जातीपातीवरुन पाहात आहेत. लोक ज्या पद्धतीने बोलतात हे सर्व पाहून ज्या वेदना, दुःख होते, ते कोणाला सांगावं? राजकीय व्यक्तीने केलेल्या वक्तव्याचे परिणाम हे जनतेला भोगावे लागतात. त्यामुळे छत्रपतींबद्दल अशा प्रकारची वक्तव्य करण्यात आली तरीही लक्प्रतिनिधी अजून गप्प का आहेत? असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/547543256757797

3 डिसेंबरला रायगडावर निर्धार मेळावा

शिव सन्मानासाठी 3 तारखेला रायगडावर निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सातारा येथील लेक व्ह्यू हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीत निर्धार मेळावा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे खा. उदयनराजे यांनी सांगितले.

फडणवीसांना दिला सूचक इशारा

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे यांची हतबलता समजू शकतो, असे म्हंटले होते. त्यांच्या विधानाला उदयनराजे यांनी उत्तर देत इशारा दिला. “परवाच्या दिवशी मला गहिवरुन आले ते कशामुळे आले? मी काही हतबल झालेलो नाही. आम्ही हातात बांगड्या घातलेल्या नाहीत. वेळप्रसंगी काय करायचं ते आम्ही ठरवू,” असा इशारा उदयनराजेंनी दिला.

आक्रोश मांडण्यासाठी रायगडावर जाणार

आजच्या घडीला व्यथा मांडण्यासारखं कोण आहे? छत्रपतीची समाधी रायगडावर आहे आणि हे सगळं वेदना दुःख रायगडच्या समाधीपुढे मांडण्यासाठी निर्धार सन्मानाचा विचार पुढे आला आहे. तेथे नतमस्तक होऊन मनातील दुःख,आक्रोश मांडण्यासाठी रायगडावर जाणार आहोत, असे उदयनराजे भोसले यांनी म्हंटले.

महापुरुषांच्या अवमानाची फॅशन झालीय

यावेळी उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आपले मत मांडले. ते म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आज महापुरुषांच्या अवमानाची फॅशन झाली आहे. राज्यपालपदावरील माणसांची हकालपट्टी केली नाही तर हे सर्व अंगवळणी पडेल. हे थांबविण्यासाठी पंतप्रधानांपर्यत निवेदन दिले आहे. अशा अवमानामुळे दंगली घडतील. यासाठी महापुरुषांच्या आवमाना विरोधात कायदा आणला पाहिजे. आज राज्यपाल बोलले उध्या कोणीतरी उच्च पदावर बसलेली व्यक्ती छत्रपतीबद्दल बोलेल, त्यावेळी काय करणार? असा सवाल उदयनराजे यांनी विचारला.