हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासहित ४० आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यांनतर सेनेत उभी फूट पडली आहे. अनेक सहकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून नव्याने सेनेची पुनर्बांधणी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे उपनेते जाहीर केले आहेत. यामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह ७ जणांचा समावेश आहे.
किशोरी पेडणेकर, दत्ता दळवी, कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्हाचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी आणि आशा मामेडी यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस निघालेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. निष्ठांवंत शिवसैनिकांची काळजी घेत त्यांना बळ देण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेतेपदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. यामध्ये आक्रमक आणि निष्ठावंत आमदार भास्कर जाधव आणि ठाकरेंची शेवट्पर्यंत साथ देणारे खासदार अरविंद सावंत यांची निवड कऱण्यात आली आहे. तर सेनेचे दिग्गज नेते लीलाधर डाके यांचे सुपुत्र पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.