हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना थेट इशारा दिला. “संजय राऊतांबद्दल मला अभिमान आहे. ज्या पद्धतीने नड्डा पक्ष वाढवत आहेत, ठीक आहे. राजकारण म्हटलं की त्याची बुद्धीबळाशी तुलना करतो. आजच्या राजकारणात बुद्धीचा नाही बळाचा वापर केला जात आहे. मात्र, दिवस सर्वदा सारखे नसतात, दिवस फिरतात, दिवस फिरले तर याचा विचार नड्डा आणि भाजपने करावा, असे ठाकरेंनी म्हंटले.
उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, भाजपसोबत लढणारा आज कोणताच राजकीय पक्ष नाही. कोणताच विचार राष्ट्रीय स्तरावर नाही, इतर संपले. जे संपले नाहीत ते संपतील. फक्त आपणच टिकणार हे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहे. महाराष्ट्रात शिवसेना संपणार म्हणतात, हे त्यांनी करूनच पाहावे, असे आव्हान ठाकरे यांनी यावेळी भाजपला दिले.
ठाकरे पुढे म्हणाले की, भाजपचा वंश कुठून सुरू झाला हे पाहायचं आहे. इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येत आहे. तर भाजपचा वंश कोणता आहे. आजचं त्यांचं राजकारण निर्घृण आणि घृणास्पद आहे. गुलामगिरीकडे वाटचाल आहे. त्याचा निषेध केला पाहिजे, अशा शब्दात ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
जेपी नड्डा काय म्हणाले?
बिहार येथील एका जाहीर सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एक खबळजनक वक्तव्य केले. ते म्हणाले की, “देशात भाजपला टक्कर देईल असा एकही पक्ष शिल्लक नाही. देशातील सर्व प्रादेशिक पक्ष नष्ट होतील, आणि फक्त भाजपच राहील. तसेच महाराष्ट्रातील शिवसेना हा पक्षही संपत चालला आहे, असे नड्डा यांनी म्हंटले.