हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. मध्यंतरी त्यांच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. सध्या परमबीर सिंह यांच्या निलंबन प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. परमबीर सिंह यांच्या निलंबनाच्या फाइलवर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आज परमबीर सिंह यांच्या निलंबनाचे आदेश जारी होण्याची शक्यता आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आले. त्यानंतर ते मुंबईत परतले. तसेच खंडणीच्या एका प्रकरणात मुंबई आणि ठाणे पोलिसांसमोर चौकशीसाठी ते हजर झाले. सरकार त्यांच्याविरुद्ध पोलीस सेवा नियमानुसार कारवाई करेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर यांच्या निलंबन फाईलवर सही केली आहे. त्यामुळे परमबीर यांचे निलंबन होणार आहे.
दरम्यान, गृह विभागाच्यावतीने अखिल भारतीय सेवा नियम, 1969 च्या नियम 3 अंतर्गत परमबीर सिंह यांच्या निलंबनाचा प्रस्ताव दिला होता. ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली होती. त्यांची सही होणे बाकी होते. दरम्यान, त्यांनी आज सही केली.