हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपसोबत 25 वर्षांची युती तोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यातच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे. याच दरम्यान, आगामी काळात भाजपसोबत पुन्हा एकदा युती करणार का असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला असता त्यांनी उत्तर देतानाच भाजपवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे ‘लोकसत्ता’च्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी भाजपसोबत युतीबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, आधी ते ज्या पद्धतीने चालले आहेत, ते सुधारणार आहेत का? हा प्रश्न आहे. सुरुवातीच्या काळात आमची युती वैचारिक पातळीवर झाली होती. पण आता वैचारिक पातळी कुठे पाताळात गेलीये की काय तेच कळत नाही. कुणाबरोबरही युती करायची असं चाललंय. याबाबत मग त्यांचाच कित्ता आम्ही गिरवला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सगळं आम्हालाच पाहिजे ही वाईट वृत्ती मग आम्ही काय धुणी-भांडी करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली नसल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणांवरही खोचक शब्दांत टीका केली.दरम्यान, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यात तपास यंत्रणांना काम नाही का?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला आहे.
ते पुढे म्हणाले, पुढच्या आठवड्यात अधिवेशन सुरू होत आहे. ते झाल्यावर पुन्हा मंत्रालयात काम सुरू करणार आहे. अधिवेशनातही मी जाणार आहे. अनेकांचा मी पुन्हा येईन यावर विश्वास नव्हता. पहिल्या वर्षी आल्यानंतर पुढच्या वर्षी येईन का असे वाटले नव्हते. पुन्हा येईन असे बोलून न येणे यापेक्षा हे बरे, असा टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना नाव न घेता लगावला.