‘गुंगाराम’ सरकारला नोटीस दिलीय,आता…; मुख्यमंत्री शिंदेंवर ‘सामना’तून हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीने नुकताच मुंबईत एक विराट काढलेल्या महामोर्चावर सत्ताधाऱ्यांनी सडकून टीका केली. महामोर्चाची नॅनो मोर्चा असा उल्लेखही केला. सत्ताधाऱ्यांच्या टीकेचा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. “राज्यातील गुंगाराम सरकारला जनतेने मोर्चाच्या माध्यमातून नोटीस दिली आहे. आता तुमचा बेकायदा सरकार कोसळणारच,” असा हल्लाबोल शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातून मुख्यमंत्री शिंदेंवर केला आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हंटल आहे की, राज्याच्या मंत्र्यांवर भीतीच्या सावटाखाली फिरण्याची वेळ यावी हे कसले लक्षण समजायचे? मोर्चा फेल झाला असे सांगणाऱ्यांसाठी हा जनतेचा सवाल आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या मिंधे सरकारविरोधात मोर्चा निघाला हे लढ्याचे आणि संघर्षाचे पहिले पाऊल आहे. भविष्यात अशा अनेक पावलांखाली हे सरकार तुडवले जाईल. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान गिळून ढेकर देणारे सरकार महाराष्ट्रप्रेमी मोर्चेकरांचा असा अपमान करीत आहे. मोर्चा फेल झाला असे छाती पिटून विकट हास्य करीत आहेत. ही एक प्रकारची विकृती आहे.

महाराष्ट्र अशा ‘गुंगारामां’च्या हाती सुरक्षित नाही व या गुंगारामांची झोप उडण्याची चिन्हे दिसत नाहीत, मात्र ती उडवावीच लागेल. मुंबईतील महामोर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाआधी निघाला. शनिवारी मुंबईत निघालेला टोकदार आणि धारदार होता. हा मोर्चा निघू नये म्हणून राज्यातील गुंगाराम सरकारने नाना खटपटी केल्या. तरीही महामोर्चा काढण्यात आला. या पुढेही अनेक महामोर्च्यांच्या माध्यमातून आंदोलनाच्या तोफा धडधडत राहतील.

मोर्चा यशस्वी झाला याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे फडणवीसांनी तळमळून सांगितलं मोर्चा फेल झाला. याचाच अर्थ मोर्चा भव्य होता. मोर्चा यशस्वी झाल्याने सरकार टरकले आहे, असं सांगतानाच या मोर्चाने मिंधे-फडणवीस सरकारला नोटीस दिली असल्याचे अग्रलेखातून म्हंटले आहे.

कोश्यारी हे शिंदे-फडणवीसांचे श्रद्धास्थान

शिवसेना ठाकरे गटाने सामनाच्या मुखपत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवरायांचा अपमान करणारे भाजपचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे फडणवीस-शिंदे सरकारचे श्रद्धास्थान असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. फडणवीस आणि इतर मंडळी या अपमानकर्त्याच्या इतक्या प्रेमात पडली आहे की, भगतसिंह कोश्यारींचा अश्वारूढ पुतळा उभारून हे लोक समृद्धी महामार्गाच्या प्रवेशद्वारावर उभारून त्यांच्या नावाने एखादे महाराष्ट्रगीत रचतात की काय असे आता जनतेला वाटू लागले, असा टोला लगावला आहे.