हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा सर्वोच्य न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना दिलेला आहे. मात्र अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्णय घ्यावा, काही वेडावाकडा निर्णय घेतल्यास सर्वोच्य न्यायालयाचे दरवाजे आमच्यासाठी उघडे आहेत असा इशारा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिला. आज मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत राहुन निर्णय घ्यावा, सर्वोच्य न्यायालयाने ती चौकट आखून दिली आहे. त्यामुळे अध्यक्षांनी काही उलटसुलट केलं तर ज्याप्रमाणे आम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेलो त्याचप्रमाणे जर इकडेही काही वेडवाकड झालं तर सर्वोच्च न्यायालयाचे दार आमच्यासाठी उघडे आहेत. त्यानंतर जी काही बदनामी होईल ती पाहता जगात तोंड दाखवायला याना जागा राहणार नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदयांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्णय घ्यावा असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आवाहन केलं आहे. तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात. आपल्या देशात जो नंगानाच आणि बेबंदशाही सुरु आहे त्यामुळे देशाची बदनामी तर होत आहेच पण तुमचीही बदनामी होत आहे. त्यामुळे अशा बदनामी करणाऱ्या लोकांना चाप लावा असं आवाहन ठाकरेंनी मोदींना केलं. आपल्या कारभाराचे धिंडवडे ३३ देशात निघू नये अशी माझी अपेक्षा आहे असं म्हणत टोलाही लगावला.