… तर महाराष्ट्र पेटवू; रिफायनरीवरून ठाकरेंनी सरकारला ठणकावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हुकूमशाही पद्धतीने रिफायनरी प्रकल्प लोकांच्यावर लादण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र पेटवू असा थेट इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला दिला आहे. बारसू येथील रिफायनरी विरोधातील लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी सोलगावमध्ये त्यांनी स्थनिकांशी संवाद साधताना सरकारवर हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, रिफायनरीसाठी लोकांची डोकी फोडण्याचा डाव आखल्या जात आहे. लोकांचे मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही. बारसूमधील लोकांना रिफायनरी नको असेल तर इथे रिफायनरी होता कामा नये, आणि जर कोणी हुकूमशाही पद्धतीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू असा थेट इशारा देत उद्धव ठाकरेंनी शिंदे- फडणवीस सरकारला ठणकावले आहे. मी बारसूबाबत केंद्राला पत्र लिहिले होते, पण लोकांवर जबरदस्ती करून प्रकल्प सुरु करा असे मी म्हंटल नव्हते असेही ठाकरेंनी स्पष्ट केलं.

माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात टाटा एअरबस, बल्कड्रग्ज पार्क यांसारखे प्रकल्प महाराष्ट्रात आणले होते. मात्र, हे सर्व प्रकल्प नंतर गुजरातला हलवण्यात आले. म्हणजे वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्रात आणि चांगले प्रकल्प गुजरातला असलं चालणार नाही. राख महाराष्ट्राला आणि रांगोळी गुजरातला असं मी होऊ देणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध करत सरकारवर हल्लाबोल केला आहे.