मुंबई प्रतिनिधी | २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप युती होणार की नाही हे अजूनही गुलदस्त्यात असताना शिवसेनेने मात्र २८८ इच्छुक उमेदवारांना शनिवारी मुंबईत बोलावून घेतलं. उमेदवारांच्या मेळाव्यात बोलत असताना आता २०१४ साल नाही, त्यामुळे आपण घाबरायचं नाही. जिथं आपला उमेदवार, तिथे भाजपने मदत करायची आणि जिथे भाजपचा उमेदवार तिथे शिवसैनिकांनी मदत करायची असं असेल तरच युती या शब्दाला अर्थ आहे. यापद्धतीने जर काम पुढं जाणार नसेल तर आपले २८८ सक्षम उमेदवार उभे केले जातीलच असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. गाव तिथे शिवसेना आणि गट तिथे शाखा या स्तरावर शिवसेनेची वाढ करायचं स्वप्न बाळासाहेबांनी बघितलं होतं, आता ते पूर्णत्वास जात असून आता मागे हटायचं नाही असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आपले आजोबा केशव तथा प्रबोधनकार ठाकरे यांचा दाखल देत एक दिवस शिवसैनिक नक्की मुख्यमंत्री होईल असा दाखलाही ठाकरेंनी दिला.
शिवसेनेचे सर्व जिल्हाप्रमुख आणि २८८ विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार मुंबईत उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले असताना भाजप आणि मित्रपक्षांना नवीन आव्हान मिळालं आहे. चंद्रकांत पाटील यांनी २९ तारखेच्या दिवशी दिलेली युतीच्या घोषणेची डेडलाईन महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन भूकंप घडवणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे. पवार कुटुंबातील राजकीय घडामोडींविषयी उद्धव ठाकरेंना विचारलं असता “ते त्यांच्या कर्माने मरणार असून त्यांना धर्माने मारू नका” असा सल्लाही त्यांनी शिवसैनिकांना दिला.